भारतात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या गव्हाच्या जातीचे शास्त्रीय नाव ट्रिटिकम एस्टिव्हम आहे. आशिया मायनर (आताचा तुर्कस्तान हा देश) गव्हाचे उगमस्थान मानला जातो. तेथे १०,००० ते १५,००० वर्षांपासून गहू पेरला जात असावा असा अंदाज आहे. गहू समशीतोष्ण प्रदेशात पिकतो. जगभरातील निम्म्या लोकांच्या आहारात गव्हाला मुख्य स्थान आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, चीन, भारत, फ्रान्स, रशिया आणि ऑस्ट्रेलिया हे देश गहू उत्पादनात आघाडीवर आहेत. गहू एक पिष्ठमय एकदल धान्य आहे. याचे पीठ करून पोळ्या, ब्रेड इत्यादी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरतात. ताजा गव्हांकुराचा रस हा पौष्टिक असतो. भारतात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन पंजाब व मध्यप्रदेश या राज्यांत होते. लोकवन, सिहोर,सोनालिका,डोगरी, कल्याण सोना या गव्हाच्या काही जाती आहेत.संशोधन केंद्र कर्नेल येथे आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, आणि तमिळनाडूसाठी डीडीडब्ल्यू 48 (DDW 48), एचआय  1633 (HI 1633), एनआईडीडब्ल्यू 1149 ( NIDW 1149) हे वाण विकसित करण्यात आले आहे.

पूर्ण वाढ झालेल्या गव्हाच्या रोपांची उंची ६०-१५० सेंमी. असते. पिकल्यावर ती सोनेरी पिवळीधमक दिसू लागते. मूळ, खोड, पाने आणि स्तबक (कणिश) हे पिकलेल्या वनस्पतीचे मुख्य भाग असतात. तिच्यामध्ये दोन प्रकारची मुळे दिसून येतात; प्राथमिक आणि द्वितीयक. गव्हाच्या बियांपासून ३-५ सेंमी. लांबीची मुळे येतात आणि ती जमिनीखाली असतात. ही मुळे ६-८ आठवडे टिकतात. जमिनीवर जसजशी खोडाची वाढ होते तसतशी खोडाला जमिनीवर द्वितीयक मुळे फुटतात. ही मुळे जाड आणि मजबूत असून त्यांच्यामुळे गव्हाच्या रोपाला भक्कम आधार मिळतो. जमीन जर भुसभुशीत असेल तर ती सु. २०० सेंमी. लांब वाढू शकतात. गव्हाच्या खोडावर ५-६ पेरे असतात. पेरे भरीव असतात. मात्र त्यांमधील कांडे पोकळ असतात. तसेच खोड पानाच्या आवरकांमुळे झाकलेले असते. पाने लांब व अरुंद असून त्यांचे दोन भाग असतात; आवरक आणि पाते. आवरक हा भाग पेर्‍यापासून सुरू होतो व खोडाभोवती वेढलेला असतो. पाते लांब व अरुंद असून त्यावर समांतर शिरा असतात. पाते आणि आवरक जेथे जुळतात तेथे पापुद्र्यासारखा पुढे आलेला भाग असतो त्याला जिव्हिका म्हणतात. पाने खोडावर समोरासमोर असतात. फुलोरा कणिश किंवा ओंबी प्रकारचा असतो. फुलोरा आल्यापासून बी तयार होण्यासाठी ३०-४० दिवस लागतात. दाणे भरीव व आकाराने लंबगोल असून त्यावर एका बाजूला उभी खाच असते. दाणे दोन्ही टोकांना बोथट असतात. उन्हाळ्याच्या शेवटी कापणीसाठी वसंत गव्हाची लागवड केली जाते, तर हिवाळ्याच्या गहूची लागवड उन्हाळ्याच्या सुरूवातीस आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात होते.

गव्हामध्ये ग्लायडीन आणि ग्लुटेनीन ही प्रथिने असतात. पिठात पाणी मिसळल्यानंतर या प्रथिनांपासून ग्लुटेन हे द्रव्य तयार होते. या घटकामुळे कणकेला चिकटपणा येतो.
 
जमिन व पूर्वमशागत:

गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी जमिन योग्य असते. परंतु हलक्या आणि मध्यम जमिनीत भरपूर भरखते व संतुलित रासायनिक खतांचा वापर केल्यास चांगले ऊत्पादन घेता येते. गव्हाच्या योग्य उत्पादनासाठी जमिन भुसभुशीत असणे जरुरीचे असते. कारण अशा जमिनीमध्ये गव्हाच्या मुळांची वाढ, विस्तार व कार्यक्षमता वाढून जमिनीतील अन्नद्रव्यांचे, पाण्याचे व्यवस्थित शोषण होते. खरीपाचे पिक निघाल्यावर लोखंडी नांगराने खोलवर (20-25 से.मी.) नांगरट करावी. नांगरट झाल्यावर हेक्टरी 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत टाकावे. जमिनीची दोन वेळा कुळवणी करावी.

पेरणी: 

बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबर पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणी 15 नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी 2.5 क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे 15 डिसेंबर नंतर केलेल्या गव्हाची लागवड फायदेशीर ठरत नाही. बागायती गहू वेळेवर पेरणीसाठी जमिनीत ओलावा नसल्यास, जमीन ओलवून घ्यावी. वापसा आल्यानंतर जमिन कुळवावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे. रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि बियाणे दोन चाद्याच्या पाभरीने 22.5 से.मी अंतरावर पेरावे. पाभरीने पेरणी एकेरी करावी त्यामुळे आंतरमशागत करणे सुलभ जाते.

पेरणी करताना प्रति हेक्टरी 60 किलो नत्र, म्हणजेच 130 किलो युरिया, 60 किलो स्फुरद म्हणजेच 375 किलो सिंगल सुपर फॉस्पेट व 40 किलो पालाश म्हणजेच 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे. उर्वरित नत्राचा हप्ता खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी 130 किलो युरिया प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी दयावे. पेरणीसाठी तपोवन (एनआयएडब्लू-917), गोदावरी (एनआय एडब्लू-295), त्र्यंबक (एनआय एडब्लू-301), एमएसीएस 6122 हे वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावेत.

महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात बागायती वेळेवर (1 ते 15 नोव्हेंबर) तसेच उशिरा (15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर) पेरणीसाठी वाण 


तण व्यवस्थापन:
गव्हामधील तण नियंत्रणासाठी, उगवणीपूर्वी ऑक्सिफ्लोफेन हे तणनाशक 425 मिली. प्रति हेक्टरी किंवा पेडिमिथॅलीन हे तणनाशक 2.5 किलोग्रॅम प्रति हेक्टरी 750 लिटर पाण्यात मिसळून पेरणी केलेल्या क्षेत्रावर एकसमानपणे फवारावे. तसेच या तणनाशकाची फवारणी करणे शक्य न झाल्यास विशेषतः द्विदल वर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 27 ते 35 दिवसा दरम्यान 2-4 डी (सोडीयम क्षार) हे तणनाशक 1.0 ते 1.5 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. फवारणीच्या वेळी तणे २-४ पानांच्या अवस्थेत असावीत याची काळजी घ्यावी. तसेच 2-4 डी फवारणी करताना हे तणनाशक आजूबाजूच्या इतर विशेषतः द्विदल वर्गीय पिकांवर उडणार नाही याची काळजी घ्यावी. तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावे. तसेच फवारणीसाठी साधा नॅपसॅक पंप वापरावा. पॉवर स्प्रे वापरू नये.

रोग व त्यांचे व्यवस्थापन:
१) तांबेराः
हा हवेव्दारे पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे पानांवर विखुरलेले नारिंगी रंगाचे फोडे येतात, जे पुढे काळे पडतात. या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात. तांबे-यापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक वानांचा वापर करावा.(उदा. एचडी २१८९, पूर्णा, एकेडब्ल्यू ३८१ व एचआय ९७७)

तांबे-याची लागण दिसताच मॅन्कोझेब (डायथेन एम ४५) हे बुरशीनाशक २५ ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेउन  १० ते १५ दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात.

२) काजळी किंवा काणीः
या रोगाचा प्रसार बियाण्याव्दारे होते. रोगाट ओंब्यामध्ये दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.

३) पानावरील करपाः
गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे प्रादुर्भाव दिसताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशक २५ ग्रॅम + १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.