मनुष्याने काही वनस्पतींची अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर गरजांसाठी लागवड सुरू केली तेव्हापासूनच तणांच्या कल्पनेचा उगम झाला. ज्या वेळी मनुष्य एखाद्या वनस्पतीची हेतुपूर्वक लागवड करतो त्या वेळी शेतात वाढणाऱ्या इतर सर्व वनस्पतींना ‘तण’ म्हणतात. तणाची ही व्याख्या मर्यादित स्वरूपाची आहे. वास्तविक कोणत्याही ठिकाणी वाढणाऱ्या अनावश्यक वनस्पतींना तण म्हणून ओळखणे आवश्यक आहे. तलावांत, कालव्यांत अगर पाण्याच्या नळांत वाढणाऱ्या वनस्पती तसेच कारखाने, घरे व इतर इमारतींभोवती उगवून येणारी लहान झुडपे गवते ही सर्व तण या सदरातच येतात. शेतातील लागवडीखालील मुख्य पिकात दुसऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष लागवड न केलेल्या परंतु उगवून आलेल्या वनस्पतींना तण असेच म्हणतात. काही वनस्पती उदा., शिंपी, कुंदा, हरळी या नेहमीच तण या नावाने ओळखल्या जातात तर काही वनस्पती सापेक्षतेने तण वा लागवडीखालील वनस्पती असतात. ‘अनावश्यक वाढणारी वनस्पती’ अशी तणाची सोप्या भाषेत व्याख्या करता येईल.

महत्त्वाची तणे:
1) एकदलवर्गीय - शिप्पी, लोना, मरड, घोडकात्रा, पंदाड, हराळी, कुंदा, लव्हाळा, विंचू चिमणचारा. 
2) द्विदलवर्गीय - दीपमाळ, दुधी, नाठ, कुंजरू, काठेमाठ, माका, हजारदाणी, तांदुळजा, पेटारी, रानताग, उंदीर काणी, शेवरा, चिमटा, रानएरंडी, गाजर गवत, बरबडा, कुरडू, टाळप, पाथर, चांदवेल, चंदनबटवा इ.

खालील कारणांमुळे तणे पिकांचे शत्रू मानली जातात :

  • तणांची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे लागवडीखालील पिकाला पाणी, प्रकाश आणि पोषक द्रव्ये यांचा योग्य पुरवठा होत नाही.
  • तणांमुळे प्रती हेक्टरी १५० किग्रॅ नायट्रोजन वाया जातो. 
  • काही तणांच्या (उदा., लव्हाळा) मुळांवाटे विषारी द्रव्ये बाहेर पडतात व त्यांचा लागवडीखालील पिकावर अनिष्ट परिणाम होतो. 
  • तणांचा नाश करण्यासाठी फार मोठा खर्च होत असल्याने पिकाच्या उत्पादनाचा खर्च वाढतो. 
  • तणांमुळे लागवडीखालील पिकांचे उत्पन्न कमी येते व पिकाची कापणीही त्रासदायक होते. 
  • पिकाची मळणी करतेवेळी तणांची बीजे पिकात मिसळल्यामुळे पिकाला बाजारात कमी किंमत येते. 
  • कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती), सूक्ष्मजंतू, व्हायरस व किडी या पिकांच्या शत्रूंना तणे आश्रय देतात.
  • काही तणे मनुष्य आणि जनावरांना विषारी असतात (उदा., सत्यनाशी अथवा पिवळा धोत्रा). 
  • पाण्यात वाढणाऱ्या तणांमुळे पाण्याच्या प्रवाहात (नद्या, कालवे, पाण्याचे नळ) अडथळा निर्माण होतो. कृषिव्यवसायात मनुष्याची पुष्कळशी शक्ती तणांशी झगडण्यात खर्च होते. याबाबतीत शिथिलता आली की, तणांचा जोर वाढतो व मग तणनाशाचे काम आणखीच त्रासदायक आणि खर्चाचे ठरते.

पिकासाठी तण उपयुक्त:

 प्रत्येक गोष्ट उपयुक्त आणि हानिकारक आहे. तणांमुळे पुष्कळसे तोटे होत असले, तरी काही फायदेही असतात, या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येत नाही. फुलावर येण्यापूर्वी तणे जमिनीत गाडल्यास पिकाला सेंद्रिय खताचा पुरवठा होतो (उदा., बावची, गोखरू). शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) तणांपासून जमिनीला नायट्रोजनाचा पुरवठा होतो. ओसाड प्रदेशांत वाळूमुळे व जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशांतील उतारावरील जमिनीचे वाहत्या पाण्यामुळे होणारे नुकसान तणांमुळे वाचते. हरळीसारख्या तणांचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होतो. काही तणांचा औषधासाठी उपयोग होतो. गुम्मा (ल्युकस ॲस्पेरा) नावाचे तण सर्पदंशावर गुणकारी आहे. पिवळ्या धोत्र्याच्या बियांपासून काढलेले तेल त्वचारोगावर उपयोगी आहे. कासे गवतासारख्या तणांचा उपयोग घरे अथवा झोपड्या शाकारण्यासाठी व लव्हाळ्याचा उपयोग उदबत्त्या तयार करण्यासाठी करतात. पिवळ्या धोत्र्याच्या झाडांमुळे क्षारधर्मी (अल्कलाइन) जमिनी सुधारण्यास मदत होते.

काही महत्त्वाची तणनाशके : 

सामान्यतः तणनाशक हे अवांछित वनस्पती नियंत्रित करण्यासाठी वापरला जाणारा रासायनिक पदार्थ आहे. पीक उत्पादनात अडथळा निर्माण करणारा एक महत्त्वाचा जैविक घटक म्हणजे तणांचा प्रादुर्भाव.
 २,४–डी : हे वृद्धिनियंत्रक अथवा हॉर्मोन वर्गातील दैहिक वेचक तणनाशक असून ते फार मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. याचा शोध १९४४ च्या सुमारास लागला आणि या व अशा प्रकारच्या इतर तणनाशकांच्या शोधामुळे तणनियंत्रणाच्या शास्त्रात फार मोठी प्रगती झाली. हे तणनाशक तृणधान्याच्या पिकांतील वर्षायू आणि बहुवर्षायू रुंद पानांच्या तणांचा नाश करते, परंतु पिकाला इजा होत नाही. तुलनेने ते स्वस्त असून मनुष्य आणि जनावरे यांना त्यापासून विषबाधा होत नाही. ते ज्वालाग्राही नसल्यामुळे आणि वापरण्यास सोपे असल्यामुळे फार लोकप्रिय ठरले आहे. या तणनाशकामुळे वापरण्याची भांडी गंजत नाहीत. अतिसूक्ष्म प्रमाणातही ते प्रभावी आहे. सोडियम लवण (उदा., डायकोटॉक्स), आमइन लवण आणि एस्टरे अशा तीन स्वरूपांत ते मिळते. ते मुळावाटे व पानांवाटे शोषिले जाते. बी पेरल्यावर परंतु उगवून येण्यापूर्वी, तसेच पीक उगवून आल्यावर अशा दोन्ही अवस्थांमध्ये ते फवारण्यास उपयुक्त आहे. गहू, भात, ऊस, मका, ज्वारी, बाजरी आणि इतर तृणवर्गीय पिकांतील रुंद पानांच्या तणांचा नाश करण्यासाठी हे तणनाशक सोडियम लवणाच्या स्वरूपांत वापरले जाते. लव्हाळा या बहुवर्षायू तणाचा नाश करण्याच्या कामीही याचा वापर केला जातो. मात्र यासाठी हे तणनाशक फक्त एकदाच फवारून तणाचा संपूर्ण नाश होत नाही. याची फवारणी करते वेळी ते शेजारच्या रुंद पानांच्या पिकांवर (उदा., कापूस, टोमॅटो, भेंडी) वाऱ्याने उडून पडणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असते, कारण पिकांना तणनाशकामुळे इजा होण्याचा धोका असतो. हे तणनाशक विषारी नसले, तरी फवारताना त्याचा त्वचेशी संपर्क येणार नाही अथवा ते नाकातोंडात जाणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

२, ४–५ टी : हे तणनाशक २, ४–डी पेक्षा जमिनीत जास्त दिवस टिकून राहत असल्यामुळे काष्ठमय तणांचा नाश करण्याच्या कामी उपयुक्त आहे. ते २, ४–डी पेक्षा महाग असते.

एमसीपीए : २, ४–डी सारखेच हे तणनाशक आहे परंतु २, ४–डी पेक्षा जास्त वेचक आहे.

एमसीपीबी आणि २, ४–डीबी :ही तणनाशके त्यांच्या मूळ स्वरूपांत वनस्पतींना विषारी नाहीत. अशिंबावंत वनस्पतीच्या पानांत या तणनाशकांचे अनुक्रमे एमसीपीए आणि २, ४–डी मध्ये रूपांतर होऊन त्या तणांचा नाश होतो. शिंबावंत वनस्पतींना काही इजा होत नाही. वाटाण्यासारख्या शिंबावंत पिकातील रुंद पानांच्या तणांचा नाश करण्यासाठी ही तणनाशके वापरतात.

स्टॅम एफ ३४ : हे स्पर्शीय वेचक तणनाशक आहे. भारताच्या पिकातील वर्षायू गवते आणि रुंद पानांची तणे यांचा नाश करण्यासाठी उपयुक्त आहे.

वरील तणनाशकांशिवाय अनेक तणनाशके उपलब्ध आहेत. ग्रॅमाझोन, टोक ई–७५, अनसार, रॅनडॉक्स आणि लास्सो ही नवी तणनाशके आहेत.

तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी - 
1) उगवणपूर्ण तणनाशके फवारताना जमिनीत ओल असावी. 
2) नॅपसॅक फवारणी पंपाचा वापर करावा. फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझलचा वापर करावा. तणनाशकासाठी स्वतंत्र फवारणी पंप वापरावा. पंप स्वच्छ धुऊनच वापरावा. 
3) फवारणी करताना हवा शांत असावी. ढगाळ वातावरणात फवारणी करू नये. 
4) पाऊस न येण्याची शक्‍यता (किमान 2 ते 4 तास) लक्षात घेऊन फवारणी करावी. 
5) कीटकनाशकांपासून तणनाशके स्वतंत्र ठेवावीत. 
6) शिफारस केलेली तणनाशके संबंधित पिकासाठी, दिलेल्या मात्रेमध्ये, दिलेल्या वेळी आणि दिलेल्या पद्धतीने वापरावीत. 
7) फवारणीसाठी वापरावयाचे पाणी स्वच्छ असावे. 
8) तणनाशकांचा आलटून-पालटून वापर करावा. 
9) तणनाशके वापरलेल्या जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर करावा. 
10) उभ्या पिकात हुडचा वापर करावा. 
11) फवारणी करताना हातमोजे, तोंडाला फडका किंवा मास्क वापरावा. 
12) फवारणी करताना धूम्रपान करू नये, तंबाखू खाऊ नये. 

अधिक जानकारी पाने के लिए कृपया अग्रोभूमि पर साइनअप करें ! आप संपर्क पृष्ठ के माध्यम से भी हमें संदेश भेज  सकते हैं। क्या आप नई पोस्ट पाने के लिए  सब्सक्राइब करना चाहते हैं? यहां क्लिक करें