विद्राव्य खते ही घनरुप स्वरूपात असून या खतांची पावडर पाण्यामध्ये मिसळून वापरण्यायोग्य खतांचे द्रावण तयार केले जाते. ही खते पाण्यामध्ये १०० टक्के विरघळणारी असतात. विद्राव्य खते ही घनरुपाप्रमाणे द्रव्ररूपातसुद्धा उपलब्ध आहेत. पिकांना ठिबक संचाद्वारे विद्राव्य खतांचे द्रावण पाण्याबरोबर दिले जाते. या पद्धतीत पिकांच्या मुळांशी गरजेप्रमाणे रोज किंवा दिवसाआड खते दिली जातात. विद्राव्य खते सर्वसाधारणपणे फवारणीद्वारे, सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळवून दिली जातात. भाजीपाल्यासाठी पुनर्लागवडीच्या वेळेस रोपांची मुळे विद्राव्य खतांच्या द्रावणात बुडवून लावली जातात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणीद्वारे दिल्यास जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. विद्राव्य खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत.

विद्राव्य खते वापरताना घ्यावयाची काळजी:

● १ किलो विद्राव्य ड्रीपखते जसे १९:१९:१९, १२:६१:००, ००:५२:३४ इत्यादी विरघळविण्यासाठी कमीत कमी १५ लिटर पाणी वापरावे.

● १ किलो ००:००:५० ड्रीप खत विरघळविण्यासाठी कमीत कमी २० लिटर पाणी वापरावे.

● कॅल्शियम नायट्रेट व कॅल्शियम + बोरॉन मिश्रखत ही ड्रीपखते १३:००:४५ व्यतिरिक्त कोणत्याही खताबरोबर मिसळु नये.

● फॉस्फरिक अॅसीड बरोबर कोणतेही फवारणी अथवा ड्रिपखत मिसळू नये.

● ठिबक मधुन खते द्यायची संपल्यानंतर १० मिनिटापेक्षा जास्त वेळ पाणी देऊ नये.

● खते विरघळविण्यासाठी पाणी स्वच्छ वापरावे.

● विद्राव्य खतांच्या उत्कृष्ट परिणामांसाठी कंपनीच्या शिफारशीप्रमाणेच उत्पादनाचा वापर करावा.

● सर्व नत्रयुक्त खते वातावरणातील आर्द्रता शोषून घेतात त्यामुळे ही खते उघडे ठेवल्यास ओलावा धरतात.

● ह्यूमिक ऍसिड व सी विड पावडर पाण्यामध्ये मिसळताना ड्रममधील पाणी अगोदर चक्राकार ढवळून घ्यावे व त्यानंतर पावडर हळूहळू पाण्यात टाकावी.

● ह्यूमिक ऍसिड विरघळविण्यासाठी पाण्याचे प्रमाण १०० लिटर प्रति किलो एवढे वापरावे.

● योग्य मिश्रणासाठी पाण्यामध्ये टाकावीत, उलटे खतामध्ये पाणी टाकू नये.

● चिलेटेड मायक्रोन्युट्रीएट वापरानंतर पॅकेट सिलबंद करून ठेवावे.

● चांगल्या परिणामासाठी व दर्जेदार उत्पादनासाठी नेहमी उच्च दर्जाची खाते व औषधेचा वापर करा

● कोणत्याही खताबरोबर कॅल्शियम, सल्फर व कॉपरयुक्त खते मिसळु नये.